श्रावण महिन्यासारखीच
सात्विक म्हणावी अशी ही यात्रा. रानात, मळ्यात
राहणारा गावकारी पाच-सहा किलोमीटरच अंतर पायी तुडवत सोमवारी भल्या पहाटे कपार्दिकेश्वराच्या
मंदिरात दर्शनासाठी हजर होतात. पावासामुळे झालेल्या चिखलात शहरी माणसांच्या वाहनांची
चाकं रुततात पण इथला गावकरी मात्र तोच गाळ तुडवत प्रसंगी अनवाणी पायांनी दर्शनासाठी
पोहचतो. राना मळ्यात राहणारी अभ्या, किसन्या, राहुल्या, बाब्या ही छोटी बच्चे कंपनी ही रविवार पासूनच
बेलाच्या झाडाला झोबंतात. कारण सोमवारी भल्या पाहाटे उठून मंदीरात जायचं आणि मंदिराच्या
बाहेर बसून आलेल्या भाविकांना बेल, फूल विकून यात्रेत मज्जा करण्यासाठी
जुगाड जमवायचा. यातलाही आनंद काही औरच.
सोमवारी देवदर्शन झाल्या नंतर आलेली मंडळी वळतात
ती गावात आलेल्या विविध पाळण्यांकडे. गावाकडे फक्त यात्रेत येणाऱ्या या पाळण्यांचे
आकर्षण छोट्या बरोबरच मोठ्यांनाही. त्याबरोबरोच भेळ, पेढा, शेव, रेवड्या, जिलेबी हा यात्रेचा खास मेवा म्हणजे खरोखरीच लहान थोरांसाठी पर्वणी असते. शेतात
राबणारा स्त्री वर्ग ही यात्रेत लागलेल्या राहुट्या मधून मनमुराद खरेदीचा आनंद लुटतो.
पावसानं शेतं तर हिरवागार केलेली असतातच पण यात्रेतला आनदांने वर्षभर शेतात राबणारा
बळीराजा ही तितकाच सुखावून जातो. इथं यात्रेत लहान मुलांसाठी हमखास घेतलं जाणारं खेळणं
म्हणजे बैलगाडी. या बैलगाडीला गाडा म्हणतात. हा गाडा म्हणजे लहान मुलांसाठी खास आकर्षण.
दिवसभर यात्रेची धामधूम झाल्यानंतर आलेल्या पाहूण्यांसाठी संध्याकाळी घरोघरी असतं ते
सात्विक जेवण तेही केळीच्या पानावर डाव्या उजव्याचा शिष्टाचार संभाळून. हिराव्या गार
पानावरचे सुग्रास पदार्थ पाहून आलेले पाहूणे ही तृप्त होतात. खरं तर घराघरात पानं
वाढली आहेत असे श्बद्प्रयोग नेहमी होतात. पण खऱ्या पानावार जेवण्याचा आनंदच निराळा. या
सात्विक महिन्यातली ही सात्विक यात्रा अनुभवण्याची मजा अवर्णिनय आहे.

इथं माडंवी
नदीच्या तीरावर कपार्दिकेश्वर हे शंकराचे मंदीर असून श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी
मंदीरात कलात्मक पध्दतीने तांदळीची पिंड बनवली जाते. मंदीराचे गुरव या पिंडी बनतात.
हे काम त्यांच्याकडे अनेक पिढ्यान पिढ्या चालत आलेले आहे. पिडींच्या चार ही थरांच्या
मध्ये लिंबू असते. मंदिराच्या आवारात चैतन्य महाराजांची समाधी असून त्या समाधी स्थळावर
तयार झालेले वारूळ आजतागायत टिकून आहे. मंदीराचा परिसर ही नयनरम्य आहे.