रविवार, २५ ऑगस्ट, २०१३

सात्विक महिन्यातली सात्विक यात्रा




     श्रावणातल्या श्रावणसरींनी निसर्गच नव्हे तर मानवी मनाच्या चित्तवृत्तीही टवटवीत झालेल्या असतात. श्रावणातलं भूरळ घालणारं निसर्ग सौदर्य आणि सोमवारी कापार्दिकेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावणारे लाखो भाविक हे चित्र दिसतं पुणे जिल्ह्यातल्या ओतुर गावात. माळशेज घाट माथ्यावर असलेलं, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि निसर्गसौदर्या ने नटलेल्या या गावाची श्रावणी सोमवारची यात्रा म्हणजे गावकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. ग्रामीण भागातल्या अनेक यात्रा या चैत्र महिन्यात असतात. पण ओतुर च्या कपार्दिकेश्वराची यात्रा असते ती श्रावणातल्या चार ही श्रावणी सोमवारी. या गावात उन्हाळयात सुट्टीला आलेल्या नातवंड पतवंडाना आज्या हमखास म्हणणार, आता सरवाण महिन्यात (श्रावणात) यात्रेला यायचं बरं का? पोटापाण्यासाठी शहरात स्थिरावलेल्या नोकरदारांना ही गावच्या यात्रेविषयी कमालीचा अभिमान. श्रावणात कोणत्या सोमवारी जायचे याचे बेत नातेवाईक आणि मित्र मंडळी शीं फोनाफॊनी करून आधिच ठरलेले. त्यात जोडीला रक्षा बंधन, जन्माअष्टमी, १५ अ‍ॅगस्ट यामुळे जोडून सुट्ट्या घेणारा चाकरमानी यात्रेचा आणि इथल्या निसर्ग सौदर्यांचा पुरेपुर आनंद लुटतो. इथं प्रत्येक सोमवारी कलात्मक पध्दतीने तयारी केलेली जाणारी तांदळाची पिंड ही तर आसपासच्या जिल्ह्यातून येणाऱ्या लाखो भाविकांच श्रध्दास्थान. चैत्रात भरणाऱ्या यात्रांचा रंग या यात्रेला नसतो.    

          श्रावण महिन्यासारखीच सात्विक म्हणावी अशी ही यात्रा. रानात, मळ्यात राहणारा गावकारी पाच-सहा किलोमीटरच अंतर पायी तुडवत सोमवारी भल्या पहाटे कपार्दिकेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी हजर होतात. पावासामुळे झालेल्या चिखलात शहरी माणसांच्या वाहनांची चाकं रुततात पण इथला गावकरी मात्र तोच गाळ तुडवत प्रसंगी अनवाणी पायांनी दर्शनासाठी पोहचतो. राना मळ्यात राहणारी अभ्या, किसन्या, राहुल्या, बाब्या ही छोटी बच्चे कंपनी ही रविवार पासूनच बेलाच्या झाडाला झोबंतात. कारण सोमवारी भल्या पाहाटे उठून मंदीरात जायचं आणि मंदिराच्या बाहेर बसून आलेल्या भाविकांना बेल, फूल विकून यात्रेत मज्जा करण्यासाठी जुगाड जमवायचा. यातलाही आनंद काही औरच.

 सोमवारी देवदर्शन झाल्या नंतर आलेली मंडळी वळतात ती गावात आलेल्या विविध पाळण्यांकडे. गावाकडे फक्त यात्रेत येणाऱ्या या पाळण्यांचे आकर्षण छोट्या बरोबरच मोठ्यांनाही. त्याबरोबरोच भेळ, पेढा, शेव, रेवड्या, जिलेबी हा यात्रेचा खास मेवा म्हणजे खरोखरीच लहान थोरांसाठी पर्वणी असते. शेतात राबणारा स्त्री वर्ग ही यात्रेत लागलेल्या राहुट्या मधून मनमुराद खरेदीचा आनंद लुटतो. पावसानं शेतं तर हिरवागार केलेली असतातच पण यात्रेतला आनदांने वर्षभर शेतात राबणारा बळीराजा ही तितकाच सुखावून जातो. इथं यात्रेत लहान मुलांसाठी हमखास घेतलं जाणारं खेळणं म्हणजे बैलगाडी. या बैलगाडीला गाडा म्हणतात. हा गाडा म्हणजे लहान मुलांसाठी खास आकर्षण. दिवसभर यात्रेची धामधूम झाल्यानंतर आलेल्या पाहूण्यांसाठी संध्याकाळी घरोघरी असतं ते सात्विक जेवण तेही केळीच्या पानावर डाव्या उजव्याचा शिष्टाचार संभाळून. हिराव्या गार पानावरचे सुग्रास पदार्थ पाहून आलेले पाहूणे ही तृप्त होतात. खरं तर घराघरात पानं वाढली आहेत असे श्बद्प्रयोग नेहमी होतात. पण खऱ्या पानावार जेवण्याचा आनंदच निराळा.   या सात्विक महिन्यातली ही सात्विक यात्रा अनुभवण्याची मजा अवर्णिनय आहे.

  इथं तयार केल्या जाणाऱ्या पिंडी वैशिष्ट्यपुर्ण तर आहेतच पण त्याचबरोबर त्या दैवी शक्तीमूळे तयार होत असल्याची श्रध्दा भाविकां मध्ये आहे. पण या पिंडी मंदीराचे गुरवच तयार करतात पण तयार करण्याची कला वैशिष्ट्य पुर्ण असल्याचे कापार्दिकेश्वर मंदीर देवस्थानचे अध्यक्ष अनिल तांबे म्हणाले.

इथं माडंवी नदीच्या तीरावर कपार्दिकेश्वर हे शंकराचे मंदीर असून श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी मंदीरात कलात्मक पध्दतीने तांदळीची पिंड बनवली जाते. मंदीराचे गुरव या पिंडी बनतात. हे काम त्यांच्याकडे अनेक पिढ्यान पिढ्या चालत आलेले आहे. पिडींच्या चार ही थरांच्या मध्ये लिंबू असते. मंदिराच्या आवारात चैतन्य महाराजांची समाधी असून त्या समाधी स्थळावर तयार झालेले वारूळ आजतागायत टिकून आहे. मंदीराचा परिसर ही नयनरम्य आहे.