गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१३

मधलीसुट्टी............

  मधली सुट्टी, रिसेस, लंच ब्रेक अशी वयानुसार आणि हुद्द्यानुसार मधली सुट्टी बदलत गेली. पण आजही घालमेल होते ती शाळेच्या मधल्या सुट्टीच्या आठवणींनी. या मधल्या सुट्टिशी आपल्या अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. शाळेत चार किंवा पाच पिरियड्स नंतर टांग (दोनदा) अशी घंटा वाजताच मुलांचा एकच कल्ला व्हायचा. शाळा तशी घरापासून जवळ असल्याने काही मुलं घरी च जायची जेवायला. पण डबे आणऱ्या मुलांचा मधल्या सुट्टीतला प्रोगॅम अगदी ठरलेला असायचा. मधल्या सुट्टीची घंटा वाजताच. बेंचवरची पुस्तकं मुलं कोंबायची पण मुली मात्र आडव्या दप्तरां मध्ये क्रमाने लावलेल्या वह्या पुस्तकां मध्ये आपली वही पुस्तक नीट बसवायच्या. कधी एखादया मुलीने आपला डबा दुसरीच्या दप्तरात ठेवायला दिला आणि समजा त्या डब्यातून तेल बाहेर आलं की (आईच्या प्रेमा सारखच डब्यातलं तेल ही बाहेर यायचं ) दप्तरांला डाग पडायचे मग काय रुसव्या फुगव्याला सुरवात अगदी धुवन दे माझं दप्तर इतपर्यंतची लटूपटूची भांडण, पण शाळा सुटल्या नंतर मात्र त्याच दोघी गळ्यात गळे घालून चाललेल्या. किती मजेशीर वाटतात आज या गोष्टी.

     


आमच्या काळी म्हणण्यासाठी मी काही अजून म्हतारी झाली नाही पण एवढं मात्र जरूर म्हणेन तेव्हा आताच्या सारखे लाड नसायचे एकाच डब्यात भाजी आणि पोळी. मग काय खालच्या पोळीला अर्धा भागाला भाजी हमखास लागणार. पण भाजी लागलेल्या त्या पोळी ची ही टेस्ट भन्नाट असयाची. ब्रेड ला बटर ही इतक्या सफाईदार पणे लावता येणार नाही इतक्या सफाईदार पणे ती भाजी त्या पोळीला लागलेली असायाची. आता कित्येक वर्षात अशी पोळी खाण्याचा योग आला नाही. टप्परवेअरच्या लिक्वीड टाईट डब्यातून तेल येण्याची काय बिशाद. ( मुळातच डायट कॉन्शियस झाल्यामुळे तेल काय डोंबल बाहेर येणार.)

 मग काय डब्बे आणणारी मुलं मुली ग्रुप ग्रुप ने हात धुवायाला बाहेर पडायची. मुलींचा ग्रुप छान रमत गमत हात धुवून यायचा मग डब्बे उघडत गॉसिप चा तडका देत डब्बा खाल्ला जायचा.( कधी शिक्षकांच, कधी शेजारच्या ताई दादाचं तर कधी आपल्याच मैत्रिणींच). मुलं मात्र डबा खाऊन खाली ग्राऊंड मध्ये पशार ही व्हायची खेळायाला आणि घरूण जेवून येणारी मुलं ही त्यांना खालीच भेटायची. पण डबा खाऊन मुलींचा ग्रुप निघायचा तॊ चार आठ आण्याला मिळणारे चिंच, खट्टा मिट्ठा, पेरू, शेंगदाणे, फूटाणे, गॊळ्या, जेली बिस्कीट( तेव्हा सुटी मिळायची) असला खाऊ घेण्यासाठी तेव्हाची स्वीट डिशः, डेजर्ट काही म्हणा. पण त्या खाऊ शिवाय चैन पडत नव्हती कोणालाही.

आजही आठवतात शाळेच्या गेटच्या बाहेर खाऊ घेऊन विकायाला बसणाऱ्या आजी. ठसठसीत कुंकू, नऊवारी साडी आणि खमका आवाज यामुळे आजही लक्षात आहे. मधल्या सुट्टित त्यांना पडणारा मुलांचा गराडा त्यांना पुरता गोंधळून टाकायाचा. ओ मला चार आण्याची चिंच द्या, ओ मला खट्टामिट्ठा द्या, ओ आजी माझे चार आणे परत द्या अशा मुलांच्या कल्ल्याणी शाळेच आवर दुमदुमन जायचं. रमणबागेत शाळेतली ही मुलं पाहून मनातल्या मधल्या सूट्टीचा विस्मरणात गेलेला तो आठवणींचा तो कोपरा पुन्हा जागा झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा